मध्य प्रदेशमधील खाण आणि कोळसा माफियांनी ज्यांची अमानुषपणे हत्त्या केली,त्या पत्रकार संदीप कोठारी यांची बदनामी करणारी एक पोस्ट सध्या फिरते आहे.आम्ही माहिती घेतली असता,इंग्रजीतली ही पोस्ट संदीपची ज्यांनी हत्तया केली त्यांच्याकडूनच पेरली गेली आहे.संदीपवर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते , तो पत्रकारच नव्हता असं भासवून घटनेचं गांभीर्य कमी करून लोकांचं लक्ष अन्यत्र वेधण्याचा प्रयत्न होत आहे.चौकशी अंती संदीपवर काही गुन्हे नक्कीच दाखल झालेले होते.मात्र पत्रकाराचा आवाज बंद करण्यासाठी असे खोटे गुन्हे पत्रकारांवर मुद्दाम दाखल केले जातात.पत्रकारांवर थेट हल्ले करून त्याला समाजाची सहानुभूती मिळू देण्यापेक्षा ही पध्दत तुलनेत सोपी आणि परिणामकारक असते.त्यामुळे हा मार्ग आपल्याकडंही सर्राश वापरला जातो.युपीतल्या ज्ये गज्रेंद्रसिंहला जाळून मारण्यात आले त्याच्यावरही खून,खंडणी आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले होते म्हणजे तो ही गुन्हेगारच होता काय? गजेंद्रसिंह असेल किंवा संदीप कोठारी यांच्यावरील एकही गुन्हा सिध्द झालेला नाही हे वास्तव अशी पोस्ट फिरविणारे विसरतात.पत्रकारितेत काही प्रवृत्ती अशा आहेत नाही असे नाही मात्र चार-दोन टक्के लोक खराब आहेत म्हणून सारी बिरादरीच खराब आहे असा गृह करून घेणे किंवा देणे हे चुकीचे आणि प्रामाणिक पत्रकारांवर अन्याय कऱणारे आहे.संदीपवर गुन्हे दाखल झाले होते म्हणून माफियांनी त्याला जिवंत जाळण्याच्या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही.त्यामुळं ज्या पत्रकाराची हत्त्या झाली आहे त्याच्याबद्दल कुणीतरी टाकलेल्या पोस्टवरून कंडया फिरविणे हत्त्या कऱण्याएवढेच संतापजनक कृत्य आहे. हे आपलेच लोक करतात ही आणखी एक शोकांतिका आहे.