तिढा सोडवायचाय कुणाला?

0
897

राष्ट्रवादीेचे अध्यक्ष शरद पवार आज सावंतवाडीत आहेत.त्या अगोदर जितेंद्र आव्हाड तिकडं जाऊन आले,अजित पवारांनी तिकडं जाऊन सभा घेतली.”आघाडी धर्म पाळण्याचं” जाहीर आवाहन केलं.दीपक केसरकरांनीही मुंबईत जाऊन शरद पवार याची भेट घेतली.चर्चा केली. हे सारं झालं तरीही रत्नागिरी-सिधुदुर्गातला तिढा सुटत नाही.राज्यात अन्यत्र फार गडबड न होता सर्वत्र आघाडी धर्म पाळला जातोय.सिंधुदुर्गातच असं का घडतंय ?.याला स्थानिक राजकारणाची किनार आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगतात.काही अंशी ते खरंही आहे पण तेच एकमेव कारण नाही.त्याला राज्यातलं राजकारण जसं कारणीभूत आहे तव्दतच राष्ट्रवादीची पक्ष विस्ताराची महत्वाकांक्षी देखील क़ारणीभूत आहे. .तसं नसतं तर दीपक केसरकरांना केव्हाच राष्ट्रवादीच्या धुरंधरांनी गप्प केलं असतं.दीपक केसरकर म्हणजे छगन भुजबळ नाहीत,अजित पवार नाहीत किंवा आर.आर.पाटीलही नाहीत.ते साधे आमदार आहेत.त्यांनी  थेट शरद पवारांचे आदेश पाळू नयेत एवढी त्यांची राजकीय झेपही नाही.किंवा .स्थानिक शिलेदार शिरजोर झालेत आणि पक्ष नेतृत्व दुबळे झालंय असं आज तरी राष्ट्रवादीत दिसत नाही.त्यामुळं तिढा सुटत नाही असं म्हणण्याऐवजी तिढा सोडविण्याची राष्ट्रवादी नेतृत्वाचीच इच्छा दिसत नाही असं म्हणंनं अधिक संयुक्तिक ठरेल.शरद पवारांना कोकणात पक्ष वाढवायचाय.विधानसभेचीही तयारी करायचीय.कोकणात विधानसभेच्या 39 जागा आहेत.त्या जागांवर राष्ट्रवादीचा डोळाय.कोकणात राष्ट्रवादी वाढायला पोषक वातावरण आहे असं शरद पवारांना वाटतंय.मराठवाड्यात पक्ष वाढायला मर्यादा आहेत,विदर्भात पक्षाचा अजिबात प्रभाव नाही.पश्चिम महाराष्ट्रातही पक्षाला मोठं आव्हान दिलं जातंय.मुंबईत अनेकदा डोकेफोड क रूनही संधी मिळत नाही.अशा स्थितीत राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष व्हायचं असेल आणि त्या जोरावर मुख्यमंत्रीपद मिळवायचं असेल तर परशुरामाची भूमी त्यांना भुसभुसीत वाटते. – म्हणूनच  नारायण राणे कॉग्रेसमध्ये गेल्यानंतर कोकणात जी ” स्पेश”  तयार झालीय ती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी गेली काही दिवस धडपडतेय.त्यासाठीच कोकणातील  भास्कर जाधव यांना पक्षाने राज्याचे अध्यक्ष केलंय.ते नारायण राणे यांचे कडवे विरोधक आहेत हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. कोकणात नारायण राणे सोडले तर कॉग्रेसचा एकही बलाढ्य नेता नाही.त्यामुळं शिवसेनेच्या विरोधात हातपाय पसरायला आपल्याला जागा आहे हे गणित राष्ट्रवादीला नक्की माहित आहे.त्यादृष्टीनं स्वाभाविकपणे त्याचे प्रयत्नही चालू आहेत.नारायण राणे यांनाही ही राष्ट्रवादी नीती माहिती आहे.त्यामुळं ते जि थं राष्ट्रवादीला ठोकता येईल ति थं ठोकत असतात. जिल्हयात राष्ट्रवादी आहेच कुठं ? इथपासून राष्ट्रवादीला विचारतंय कोण?  इथ पर्यत राणे राष्ट्रवादीलबद्दल सातत्यानं कुत्सितपणे बोलतात ..राष्ट्रवादीचं खच्चीकरण करण्याचं जे धोरण नारायण राणे यांनी राबविलं आहे ते याच मुळं.गेल्या काही दिवसातील कोकणातील राड्यांचा इतिहास पाहिला तर राणे विरूध्द सेना यांच्यात जेवढे राडे झाले नाहीत त्यापेक्षा राणे विरूध्द राष्ट्रवादी राडे झाले आहेत.अगदी निवडणुकींच्या तोंडावरही चिपळूण आणि अन्यत्र हे प्रकार घडलेले आहेत.याचं काऱण एकाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे आणि दुसऱ्याला पक्ष वाढवायचा आहे. – यातून कोकणात जीवघेणी सत्तास्पर्धा सुरूय. – याचा परिणाम  दोन्ही पक्षातील सामांन्य कार्यकर्त्यांच्या मनात परस्परांबद्दल एक अढी ,कटुता निर्माण होण्यात झाला. अशा स्तितीत हे कार्यकर्ते एकत्र येतील अशी शक्यता नाही.पक्षाचा आदेश झुगारून देत 400 प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाकंडं आपले राजीनामे देऊन पक्षाचा कोणताही आदेश आपण मानणार नाही असे त्यांनी जाहीर केलंय.शरद पवार यांच्या सभेवर देखील बहिष्कार टाकण्याचा नि र्णय  त्यांनी म्हणे घेतला आहे .शरद पवार याच्या आदेशाला अशी केराची टोपली दाखविण्याची हिंमत महाराष्ट्रात अन्य पक्षातही कोणी दाखवू शकत नाही तर त्यांच्या पक्षातच पवारांचे आदेश मानले जाणार नाहीत असं होईल यावर शेंबडं पोर देखील विश्वास ठेवणार नाही.शरद पवारांना राष्ट्रवादीत कोणी आव्हान देऊ शकत नाही ,पक्षावर पवारांचं पूर्ण नियंत्रण आहे,असं असतानाही दीपक केसरकर यांच्यासारखा दूर कोकणातील एक साधा आमदार पक्षाला आव्हान देत असेल तर पाणी कुठं तरी मुरतंय हे नक्की.अमरावतीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीस विरोध केल्यामुळं तेथील काही प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षातून ताबडतोब हाकालण्यात आलं.त्या अगोदरही कोकणात शेकापबरोबर वाद झाल्यानंतर राष्ट्रवादीनं सुनील तटकरे यांनाही मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला होता आणि कुठलीही सबब न सांगता सुनील तटकरे यांनाही तो द्यावा लागला होता. पक्ष शिस्तीचा जेव्हा विषय येतो तेव्हा पवार खंबीरपणे रोखठोक भूमिका घेतात हा आजवरचा त्यांचा अनुभव आहेत.हे सारं असताना दीपक केसरकर जर पक्षाचं ऐकत नसतील तर त्यांच्यावर अमरावतीत जशी कारवाई झाली तशी कारवाई करण्यास पक्ष का घाबरतोय हे कोडं न उलगडण्याएवढी जनता दुधखुळी नाही.रत्नागिरीची पालकमंत्री उदय सामंत यांनी नारायण राणेंना कुरवाळायचं,दीपक केसरकर यांनी विरोध करायचा,भास्कर जाधव यांनी अलिप्त राहात ” मी त्या गावचा नाहीच ” अशी भूमिका घ्यायची,जितेंद्र आव्हाड,अजित पवार,आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांनी आघाडी धर्म पाळलाच पाहिजे असे सात्वनपर  सल्ले  द्यायचे हे राष्ट्रवादीच  सध्याचं धोरण आहे. 17 तारखेपर्यत असंच चालू द्यायचं अशी यामागची योजना असावी.आम्ही राणेंना चुचकारतो,तुम्ही तुमच्या पध्दतीनं राजकारण चालू ठेवा असा या ़शरद नीतीचा अ र्थ आहे.त्यामुळं सारे प्रयत्न करूनही कोकणातला तिढा सुटत नाही असं चित्र तयार झालेलं आहे.वास्तव असं आहे की,हा तिढा सुटावा अशी राष्ट्रवादीच्या नेत्याची आणि अगदी कॉग्रेसच्या नेत्यांचीही  इच्छा नाही. – राष्ट्रवादीचे सोडा हा तिढा सुटावा म्हणून कॉग्रेस काय करतेय ? .काहीच नाही .रायगडमध्ये जेव्हा अ.र.अंतुले रूसून बसले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मुनलाईटवर जाऊन त्यांची दीड तास मनधरणी केली.या उलट ते नारायण राणे यांचा ट ाहो ऐकत असतानाही त्यांच्या मदतीसाठी फायरब्रिगेटची भूमिका निभावतात असं दिसत नाही.याचं कारण नारायण राणे याचं प्रस्त वाढलेलं त्यांनाही नकोय.त्यामुळंच कॉग्रेसचा एकही नेता नारायण राणे यांच्या मदतीसाठी फिरकलेला नाही हे वास्तव आपल्याला नजरेआड करता येणारं नाही

.          नारायण राणे यानी स्थानिक पातळीवर जसे अनेकशत्रू निर्माण करून ठेवले आहेत तसेच त्यांनी राज्याच्या पातळीवरही शत्रू तयार केलेले आहेत.त्यांच्या आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या वागण्या-बोलण्यातली मग्रुरी अनेकांना आवडत नाही.त्यामुळं नारायण राणेचं सिंधुदुर्गात पानिपत झालेलं पहायला अनेकजण इच्छुक आहेत.सध्याचा जो पेच आहे त्याचं ते कारण आहे.तुम्ही सिंधुदुर्गात आघाडी धर्म पाळा आम्ही अन्यत्र पाळतो असं नारायण राणे भलेही कितीही कळवळून म्हणत असले तरी कॉग्रेसच्या एकाही वरिष्ठ नेत्यानं राष्ट्रवादीला असा दम दिलेला नाही की,तुमचा दीपक केसरकर किंवा अन्य कोणी जर कॉग्रेसला मदत करणार नसेल आणि त्यांना वठणीवर आणण्यात तुम्ही समर्थ नसाल तर आम्ही राज्यात अन्यत्र तुमच्या उमेदवाराना मदत करणार नाही.असं ना माणिकराव ठाकरे बोलताहेत ना,पृथ्वीराज चव्हाण.कॉग्रेसमधील हे राजकारण शरद पवारांना माहित असल्यानंच ते राणेंना ” मी केसरकर यांना सांगतोय पण ते ऐकत नाहीत ”  असं वरवर हताशपणे बोलताना दिसतात.” मी मारल्यासारखं करतो,तु रडल्यासारखं कर” असा हा मामला आहे. – प्रश्न असा पडू शकतो की,हे जर खरं असेल तर मग राष्ट्रवादीचे नेते आणि स्वतः – शरद पवार वारंवार सिंधुदुर्गात का जाताहेत? .दोन कारणं आहेत.एक तर आम्ही,पक्ष शंभर टक्के तुमच्याबरोबर आहे पण स्थानिक नेते ऐकत नाहीत हे राणे यांच्या मनावर बिंबवायचे आहे .दुसरं असंही आहे की,निलेश राणे जर निवडून आलेच तर आम्ही येऊन गेल्यामुळं ते निवडून आले असा दावा करायलाही तर जागा राहिली पाहिजे ना..त्यासाठी हे दौरे वगैरे.

 

निलेश राणेंचा पराभव हा अनेक अर्थानं राष्ट्रवादीच्याही पथ्यावर पडणारा आहे.नारायण राणे यांच्या पराभवात राष्ट्रवादीचा विजय दडलेलाय .नारायण राणेंचा अडथळा जर संपला तर पनवेल आणि त्याअगोदर ठाण्यापासून ते सावंतवाडीपर्यत कोकणात राष्ट्रवादीला कोणीही रोखू शकत नाही.रायगडात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे भक्कमपणे उभे आहेत,रत्नागिरीत भास्कर जाधव आहेत आणि खाली सिंधुदुर्गात दीपक केसरकर वगैरे मंडळी आहे.  आज कोकणाच्या चारही जिल्हयात मिळून राष्ट्रवादीकडं केवळ दहाच आमदार आहेत पण ही संख्या किमान वीसावर नेण्याची राष्ट्रवादीची कल्पना आणि योजना आहे.त्यासाठी गरज पडल्यास रायगडात शेकापबरोबर आघाडीही केली जाऊ शकते.( नाही तरी शेकापलाही अशा आघाडीची गरज आहे.कोणाचा तरी हात धरल्याशिवाय शेकापचे अलिकडं भागत नाही.शिवसेनेचा कंटाळा आलाय,म्हणून मनसेला पकडा.मनसेचा फार उपयोग शेकापला होणार नाही.अशा स्थितीत जिल्हा परिषदेतील राजकारणाचं निमित्त करून शेकापबरोबर राष्ट्रवादी आघाडी होऊ शकते.)असं झालं तर कोकणातून कॉग्रेस हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. कारण कॉग्रेसची ही बरबादी रोखण्याएवढा एकही प्रबळ नेता  नाही. अंतुले यांच्यानंतर नाव घेता येईल किंवा ज्याला सारा कोकण ओळखतो असा एकही नेता कॉग्रेसमध्ये  नाही. कॉग्रेसचा जो परंपरागत मत दार आहे त्यांच्या जिवावर पक्षाची विभागात थोडी-फार उपस्थिती  दिसते.ही सारी परिस्थिती राष्ट्रावादीसाठी केवळ अनुकूलच नाही तर हे एक चांगली संधी आहे.त्यामुळेच कॉग्रेसला चुचकारतच राष्ट्रवादीने कोकणात पाय खंबीरपणे रोवायला सुरूवात केलीय. कोकणातील मावळ तर अगोदरच राष्ट्रवादीकडंय.आता रायगडही राष्ट्रवादीनं घेतलाय.येथून सुनील तटकरे विजयी झाले तर पुढील अनेक वर्षे आणि जोपर्यत आघाडी आहे तोपर्यत राष्ट्रवादी रायगडवरील आपला हक्का सोडणार नाही.रायगडात सध्या कॉग्रेसचा एकच आमदार आहे.प्रशांत ठाकूर हे पक्ष म्हणून नव्हे तर त्यांच्या व्यक्तिगत संबंधावर विजयी झालेले आहेत.अशा स्थितीत एकही ,खासदार  नाही,जिल्हा परिषदेतही सहाच सदस्य,नगरपालिका नाही.पंचायत समित्या नाहीत अशा सत्ताहिन अवस्थेत रायगडात कॉग्रेस जास्त दिवस जक्षू शकत नाही.रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला तेच करायचंय. – सिंधुदुर्गात जिल्हा परिषद कॉग्रेसकडं आहे पण नारायण राणेंचा पराभव हा जिल्हयातील अनेक सत्तासमिकरणं बदलू शकतो हे विसरता येणार नाही.राष्ट्रवादीच्या नियोजनानुसार नारायण राणे जर पराभूत झाले तर पुढच्या वेळेस रत्नागिरीवरही राष्ट्रवादी आपला हक्का सांगू शकते. कोकणातून कॉग्रेस हद्दपार करण्याची ती पुढची पायरी असेल. सधुदुर्गातील सध्याच्या घडामोडींकडं याच अंगानं बघावं लागेल.

S.M.Deshmukh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here