कथित विठोबाची कैफियत..

    0
    798

    कथित विठोबाची कैफियत..

    दहा-बारा वर्षांपूर्वी रायगडात एक प्रयोग केला.जरा हटके काही करायची कल्पना होती.केवळ संघटना बांधायची नव्हती.परस्पर आपुलकी,प्रेम,जिव्हाळा बांधायचा होता.वाढवायचा होता.थोडक्यात एक विशाल कुटुंबंच उभं करायचं होतं.सार्‍यांनाच आवडली ही कल्पना.मग कल्पना,कल्पना राहिली नाही.तिला मूर्त स्वरूप प्राप्त झालं.बघता बघता पत्रकाराचं एक आदर्श कुटुंबं उभं राहिलं.भांडणं नव्हती,राग-लोभ नव्हते,हेवेदावे नव्हते आणि पदांसाठी लठ्ठालठ्ठी तर अजिबातच नव्हती.पदाचा विषय आला की,सारेच दुसर्‍याचं नाव सूचवायचे.हा एकोपा,ही कुटुंबावरची भक्ती पाहून मी खूष व्हायचो.महाराष्ट्रभर रायगडातील या अनोख्या फॅमिलीबद्दल सांगत सुटायचो.”पत्रकारांची एकजूट म्हणजे काय असते ते पहायचं असेल तर रायगडात या” अशी हाक द्यायचो.”पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपायचं म्हणजे काय करायचं त्याचा अनुभव घ्यायचा तर रायगडात या” असं निमंत्रण द्यायचो.मुंबई-गोवा महामार्गाच्या आंदोलनानं तर ही रायगडची ही फॅमिली राज्यभर चर्चेचा,कुतूहलाचा आणि अभिमानाचा विषय ठरली.”संघटन रायगड सारखं असावं” असं महाराष्ट्रात सांगितलं जाऊ लागलं होतंं.मला यापेक्षा आणखी काय हवं होतं?.रायगडातून आवाज आला की,मी धावत-पतळ रायगडात यायचो.सर्वाशी गप्पा मारताना,त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होताना आनंद वाटायचा.माहेरी आल्यासारखं वाटायचं.रायगडात आलो की,फॅमिलीतलं सळसळतं चैतन्य ,दृष्ट लागावी असा एकोपा पाहून नवी उर्मी मिळायची,नवा उत्साह घेऊन मी परत पुण्याला यायचो.नवे लढे लढायला बळ  मिळायचं.कोणतंही आंदोलन लढायचं ठरवताना रायगडचं माझं कुटुंब माझ्या पाठिशी आहे ही जाणीवही मला हत्तीचं बळ  द्यायची.खरं सांगू?,पत्रकार हल्ला विरोधी मी राज्यभर लढतो ना,ते रायगडच्या बळावर.मला नक्की खात्री होती,की अनेकदा तुम लढोचा अनुभव येत असतो,”हम तुम्हारे साथचे” नारेही अनेकजण देतात. पण जेव्हा मैदानात उतरायची वेळ येते तेव्हा रायगडच्या  या कुटुंबातलेच माझी भावंडं  निष्ठेनं,माझ्यावरील प्रेमाखातर माझ्या बरोबर असतात हा अनुभव अनेकदा मी घेतला आहे.माझ्या व्यक्तीगत अडीअडचणीच्या प्रसंगातही हेच कुटुंबं मला धीर देत आलेलं आहे,”मला काही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत” असं सांगत आलं आहे.मी भाग्यवान यासाठी आहे की,असं प्रेम,आपलेपणा फारच थोड्याच्या वाट्याला येतो.तो मला मिळायलाय.

    अलिकडं काय झालंय कोणाला माहित? पण काही तरी बिनसलंय.कुटुंबाची वीण विस्कटत चाललीय.इगो जागे झालेत.प्रेमाची जागा मत्सरानं घेतलीय.आरोप-प्रत्यारोप होऊ लागलेत.अन्यत्र जे चित्र असतं तेच माझ्याही कुटुंबात दिसायला लागलं आहे.घरात अनेकजण राहात असतात तेव्हा भांडयाला भांडं लागणं स्वाभाविक असतं.पण विषय आता तीथंपर्यतंच राहिला नाही.अगदी कोर्टात जायची भाषा व्हायला लागली आहे.नळावरच्या भांडणासारखी भांडणं चव्हाट्यावर यायला लागलीत.सरळ सरळ दोन गट पडलेत असं चित्र दिसायला लागलंय.माझं हे घर कधी फुटतंय,घराचा कधी इस्कोट होतोय याची चातकाप्रमाणं वाट पाहणार्‍यांच्या मनात हे सारं पाहून,वाचून नक्कीच गुदगुल्या होत आहेत.अशा आनंदी टाळ्या वाजविणार्‍यात राजकाऱणी आहेत,पत्रकार मित्र आहेत आणि असेच बरच जण आहेत.माझं कुटुंब कालपर्यत राजकारण्यांना धडकी भरवेल असं एकजूट होतं,एक दबावगट म्हणून जिल्हयातील वाईटांवर नियंत्रण ठेऊन होतं.चांगल्याची पाठराखण करणारी मंडळी म्हणून नावलौकीक होता . ती  ओळख होती .हे सारं कधी मोडून पडेल याची वाट पाहणार्‍यांना नक्कीच आता खुषी वाटत असेल.मी मात्र अस्वस्थ आहे,दुःखी आहे,कष्ठी आहे.शिवाय हतबलही आहे.कुणाला बोलू,? कोणाला उपदेश करू?,कोणाला विनंती करू? कारण “आम्ही कुणाचं ऐकणार नाहीत” अशा टोकाला हे वाद गेले आहेत.”कुणाचं” म्हणजे त्यात मी ही  नक्कीच आहे.त्यामुळं मनातल्या मनात दुःखाचे कढ काढत बसण्याखेरीज मी काहीच करीत नाही.अनेकाना वाटतं थोरले बंधू  का बोलत नाहीत?,दोन्ही बाजुंचे कान का उपटत नाहीत?.दोन्ही बाजुंना शांत होण्याचे सल्ले का देत नाहीत?.खरं सांगू?  मी हतबल आहे.काऱण घरातल माझी ही भावंडं आता मोठी झालीत.कालपर्यत जेव्हा ही भावंडं रायगडच्या अंगणात बागडायची,त्यावेळी मी कुतूहलानं त्यांचे कान उपटायचो.शाबासकी द्यायचो,कोणी मस्ती करू लागला तर त्याच्या पाठीवर प्रेमाणं धपाटा  लगवायचो.आता मंडळी मोठी झालीत.आपण काय करायचं,कसं करायचं हे त्याना कळायला लागलं आहे.कुणाला वेगळं व्हायचं आहे तर कुणाला पुढं जायचं आहे.त्यांच्या इच्छा,आकांक्षा आणि महत्वाकांक्षांना आवर घालणं आता माझ्या आवाक्यात राहिलं नाही.समजूत काढण्याची वेळही आता निघून गेलीय.त्यामळं मोठ्या कष्टानं बांधलेल्या या कुटुंबाचे वासे उसवत जाताना पाहात बसण्याशिवाय माझ्या आता काही हाती राहिलं नाही.मला सारं दिसतंय.सारं कळतंयही.विषय फार मोठे नाहीत.वाद इगोचे आहेत.चुका सार्‍यांकडूनच झाल्यात.पण समोरच्याची  चूक आभाळा एवढी आहे असं सार्‍यानाच वाटतंय.माझी काहीच चूक नाही असाही भ्रम आहे.आत्मपरीक्षण करायची कोणाचीच तयारी नाही.समोरच्यावर खापर फोडून सारेच मोकळे होत आहेत.ज्यानी यात लक्ष घालायला हवं असेही घरातील कर्ते-घर्तेही गप्प आहेत.त्यामुळं घराची घडी विस्कटत चाललीय.मी काय करू,?कुणाला बोलू,? कसं समजून सांगू? ते मलाही कळत नाही.सारीच भावडं आहेत.खरं बोललो तरी एकाला वाटणार दुसर्‍याची बाजू घेतोय.माझ्यावर अन्याय करतोय.त्यानं आणखी इस्कोट व्हायचा.मी विठोबा नाही.पण सारेच माझ्यावरील प्रेमापोटी मला विठोबा म्हणतात.हे सारं घडताना पाहून या हतबल कथित विठोबाची अवस्था काय होत असेल याचाही जरा विचार सार्‍याच सदस्यांनी केला पाहिजे.तो होणार नसेल तर घर बांधण्यात माझीच कुठं तरी चूक झालीय,मीच कमी पडलोय,माझ्या संस्कारातच काही तरी कमी आहे असं मला वाटेल.असं झालं असेल तर माझ्या कुटुंबांतील सर्व सदस्यांची मी क्षमा मागतो आणि आपण सारे सुज्ञ आहात आपणास जे योग्य वाटेल,जे ठीक वाटेल ते आपण करावं अशी विनंती करून माझं हे प्रवचण थांबवतो.

    तुमचा

    हतबल कथित विठोबा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here