‘एक्स्प्रेस वे’वर मरण स्वस्त

0
1052

गेल्या काही दिवसांपासून ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर अपघातांच्या प्रमाणात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रविवारी पहाटे पनवेलजवळ झालेला अपघात ‘एक्स्प्रेस वे’वर आतापर्यंत झालेला दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी २७ मे २०१२ रोजी खालापूर टोलनाक्याजवळ धामणी गावच्या हद्दीत वऱ्हाडाच्या दोन मिनी बसला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला होता, तर १७ जण गंभीर जखमी झाले होते. येरवडा पुणे येथील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या एकनाथ बबन भवले यांच्या लग्नाचे वऱ्हाड घाटकोपर येथून लग्नानंतर येरवड्याला परत होते. या वेळी एक मिनी बस पंक्चर झाल्याने तिचे पंक्चर काढण्यासाठी मार्गाच्या सर्व्हिस लेन उभ्या असलेल्या मिनी बसला मुंबईहून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात भवले यांच्या २८ नातेवाइकांचा मृत्यू झाला होता, तर १७ जण गंभीर जखमी झाले होते.

तीन वर्षांत ३७० जणांचा मृत्यू

गेल्या तीन वर्षांत या रस्त्यावर १५८० अपघातात ३७० जणांचा मृत्यू झाला असून, १८१६ गंभीर जखमी झाले आहे. ८८ टक्के अपघात मानवी चुकांमुळे, तर १४ टक्के अपघात तांत्रिक कारणामुळे झाल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. अतिवेग, फाजिल आत्मविश्वासाने ओव्हरटेक करणे, वाहन चालविताना झोप लागणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आदी कारणांमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अपुरे मनुष्यबळ

‘एक्स्प्रेस वे’वर रायगड, ठाणे, पुणे या जिल्ह्यांत एकूण चार महामार्ग पोलिस ठाणी आहेत. यापैकी दोन पोलिस ठाणी ‘एक्स्प्रेस वे’जवळ आहेत. या ठाण्यातील वाहने कालबाह्य झाल्याने महामार्ग पोलिसांना गस्त घालण्यासाठी तसेच अपघातस्थळी जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बहुतांश ठाण्यात अपुरे मनुष्यबळ हा चिंतेचा विषय असून, उपयुक्त कर्मचाऱ्यांवरच तिन्ही मार्गावरील सुरक्षेचे काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर ताण येतो.

चार पोलिस चौक्या

– महाराष्ट्रात महार्गावर ६३ महामार्ग पोलिस ठाणी असून, अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.
– प्रत्येक पोलिस ठाण्याचे एकच गस्त पथक महामार्गासह त्यांच्या अंकित असलेल्या मार्गावर गस्त घालत आहे.
– मुंबई पुणे ‘एक्स्प्रेस वे’वेवर एकूण चार महामार्ग पोलिस चौक्या आहेत. यामध्ये बोरघाट (दस्तुरी), खंडाळा या दोन पोलिस चौक्या असून, पळस्पे व वडगाव या दोन्ही चौक्या ‘एक्स्प्रेस वे’पासून, तीन ते आठ किलोमीटर लांब अंतरावर आहेत.

निवाऱ्याची सोय नाही

‘एक्स्प्रेस वे’वर अवजड वाहनांच्या चालकांच्या निवाऱ्यासाठी अद्याप कोणतीही सोयी नसून, वाहनचालकांना प्रवासादरम्यान विश्रांती मिळावी यासाठी लोणावळयाजवळ कुसगाव टोल नाक्याजवळ एक प्रशस्त इमारत बांधली आहे. मात्र, वापराअभावी ती धूळखात पडलेली आहे. या ठिकाणी अनेक गैरप्रकार चालतात. या मार्गावर खालापूर, कुसगाव, उर्से हे तीन टोलनाके आहेत.

अपघातांची चौकीनिहाय आकडेवारी

पळसे पोलिस चौकी

– २०१२ मध्ये १७२ अपघात झाले असून, यामध्ये ६४ जणांचा मृत्यू झाला तर ७६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
– २०१३ मध्ये १३७ अपघात झाले असून, यामध्ये ३० जणांचा मृत्यू तर १३ गंभीर जखमी झाले आहे.
– २०१४ मध्ये १५६ अपघात झाले असून, यामध्ये ३० जणांचा मृत्यू तर ५५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
– जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत ५० अपघात झाले असून, यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातप्रवण क्षेत्र – भातन बोगदा (सरळ रस्ता व नंतर अचानक वळण) रेसवाडी व धामणीगाव (सरळ रस्ता व वळण)

बोरघाट (दस्तुरी) पोलिस चौकी

– २०१२ मध्ये १२१ अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून, ४५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
– २०१३ मध्ये १०४ अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला असून, ७९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
– २०१४ मध्ये ८३ अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला असून, १०९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
– जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत झालेल्या २० अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातप्रवण क्षेत्र : अमृतांजन पूल (नागमोडी वळणे व तीव्र उतार व चढ), अंडाकृती पूल (नागमोडी वळण व उतार), खोपोली एक्झिट (वळणे, उतार व चढ), फूडमॉल ढेकूगाव (तीव्र उतार, वळणे आणि चढ)

खंडाळा पोलिस चौकी

– २०१२ मध्ये ३८ अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून, १३६ जखमींमध्ये ३७ गंभीर जखमींचा समावेश आहे.
– २०१३ मध्ये १०८ अपघातात २१ जणांचा मृत्यू झाला असून, ३२४ जखमींमध्ये १७६ गंभीर जखमींचा समावेश आहे.
– २०१४ मध्ये ६१ अपघातात २९ जणांचा मृत्यू झाला असून, १६६ जखमींमध्ये ८३ गंभीर जखमी झाले आहेत.
– जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत ७ अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, ५९ जखमींमध्ये ९ गंभीर जखमींचा समावेश आहे.
अपघातप्रवण क्षेत्र : अमृतांजन पूल (तीव्र उतार, नागमोडी वळणे), खंडाळा एक्झिट (नागमोडी वळणे, तीव्र उतार), कुणे पूल (नागमोडी वळणे, तीव्र उतार), कुसगाव पूल (तीव्र वळण), देवले पूल (सरळ रस्ता, उतार)

वडगाव मावळ पोलिस चौकी

– २०१२ मध्ये २३९ अपघातात ५२ जणांचा मृत्यू झाला असून, १५१ जखमींमध्ये ४९ गंभीर जखमी झाले आहेत.
– २०१३ मध्ये १५२ अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून, ८१ जखमींमध्ये १६ गंभीर जखमी झाले आहे.
– २०१४ मध्ये ११० अपघातांत ३२ जणांचा मृत्यू झाला असून, ५५ जखमींमध्ये २२ गंभीर जखमी झाले आहे.
– जानेवारी ते एप्रिल २०१५ पर्यंत २२ अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, ३१ जखमींमध्ये १९ गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातप्रवण क्षेत्र : कामशेत बोगदा (सरळ रस्ता व उतार), पवना पोलिस चौकी (सरळ रस्ता व उतार), सडवली, ओझर्डे व उर्से (सरळ रस्ता, मध्यम स्वरूपाची (महाराष्ट्र टाइम्समधील बातमी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here