काल आचार्य अत्रे यांच्या गावात..सासवडमध्ये होतो.अत्रे यांच्या गावातील पत्रकारांनी आणि गावकर्यांनी आचार्य अत्रे पुरस्कार देऊन माझं कौतूक केलं.आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार,आचार्य अत्रे यांच्या गावात आणि आचार्य अत्रे सभागृहात अत्यंत दिमाखदार सोहळ्यात मला दिला गेला…
मला आणखी काय हवंय ? ..त्यामुळं कालचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय ठरला..आचार्य अत्रे हे केवळ पत्रकारांचंच नव्हे तर तमाम मराठी माणसांचं दैवत ..आमची आचार्य अत्रे यांच्याशी नाळ आणखी एका कारणांनं जोडली गेलेली आहे… आम्ही ज्या संस्थेची पालखी वाहतो त्या मराठी पत्रकार परिषदेचे आचार्य प्र.के.अत्रे हे 70 वर्षांपूर्वी अध्यक्ष होते.1950 मध्ये बेळगावमध्ये जे परिषदेचं अधिवेशन झालं त्याचं अध्यक्षपद आचार्य अत्रे यांनी भूषविलं होतं.या नात्यानं आमची आचार्य अत्रे याच्याशी आणखीनच जवळीक…बेळगांव अधिवेशनात अत्रे यांनी केलेलं भाषण आमच्याकडं उपलब्ध आहे.ते लवकरच सर्व पत्रकारांना पुस्तक रूपानं उपलब्ध करून देणार आहोत.त्या अधिवेशनात अत्रे यांनी पत्रकारांवर होणारे हल्ले आणि विविध मार्गानं माध्यमांचा आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न याविरोधात आवाज उठविला होता.शिवाय वृत्तपत्रे कशी धनदांडग्यांच्या ताब्यात जात आहेत आणि तो कसा लोकशाहीला धोका आहे यावरही भाष्य केलं होतं.अत्रे यांनी तेव्हा केलेलं भाकित आज उग्र स्वरूपात आपल्यासमोर आलं आहे.धनदांडग्यांनी माध्यमांवर पूर्ण कब्जा मिळविलेला आहे..आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य हा विषय आता या धनदांडग्यांच्या हितसंबंधांशी निगडीत बनलेला आहे..राज्यातील पत्रकारांच्या प्रयत्नांमुळं राज्यात कायदा वगैरे झाला असला तरी माध्यमांची मुस्कटदाबी बंद झालेली नाही.मात्र त्याविरोधात अत्रे यांनी आवाज उठविला होता आणि आज आम्ही तेच काम करतो आहोत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे.
सासवडला यापुर्वी एकदा गेलो होतो.मराठी पत्रकार परिषदेनं आचार्य अत्रे यांच्या छायाचित्र असलेलं कॅलेंडर प्रसिध्द केलं होतं.त्याचं प्रकाशन कर्हेच्या काठावर केलं गेलं होतं.तेथून जवळच आचार्य अत्रे यांचा वाडा आहे.आज तेथे कोणी राहात नसलं तरी हा सारा परिसर अत्यंत देखणा आणि रमनीय आहे.सासवड हे सुंदर,स्वच्छ आणि सास्कृतिक वारसा जपणारं गाव असलं तरी या गावानं आचार्य अत्रे यांची उपेक्षा केली याची खंत तेव्हाही होती आणि आजही आहे..आभाळा एवढं कर्तृत्व गाजविणारा हा माणूस..जीवनाचं असं एकही महत्वाचं क्षेत्रं नाही की जिथं आचार्य अत्रे यांनी आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला नाही..ज्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं तिथं त्यांनी सर्वोच्च स्थान पटकाविलं.मग ते सिनेमा असो,नाटक असो.साहित्य असो,पत्रकारिता असो,काव्य असो की वक्तृत्व असो..आपल्या अफाट विद्वतेच्या जोरावर त्यांनी आपल्या नावाचा दरारा आणि दबदबा निर्माण केला होता..पण त्याची किंमत सासवडला नाही असं खेदानं म्हणावं लागेल.कारण त्यांचं स्मृती जतन करणारं स्मारक सासवडमध्ये नाही..नगरपालिकेनं एक सभागृह बांधलेलं आहे..त्याला अत्रे याचं नाव दिलंय एवढंच काय ती आचार्यंची आठवण..या सभागृहात पुतळा नव्हता तो काकासाहेब पुरंदरे यांनी देणगी स्वरूपात दिलेला आहे.सभागृहात बसविलेला हा पुतळा कधी स्वच्छ केला होता माहिती नाही..काल धुळीनं आणि घाणीनं तो माखलेला दिसला..मुंबईत आचार्य अत्रे यांचा पुतळा आहे…पण सासवड मधील चौकात आचार्यांचा एकही पुतळा नाही.पुतळ्यांना माझा विरोध असला तरी पहाडा एवढं अफाट कर्त्ृत्व गाजविलेल्या एखादया महान व्यक्तीच्या स्मृती जतन करण्यासाठी काही तर व्हायला हवं की नको ? .तसां कोणताही प्रयत्न सासवडमध्ये झालेला दिसला नाही.विजय कोलते यांची एक संस्था आहे..त्यांनी छोटासा प्रयत्न जरूर केलेला आहे.त्या संस्थेत आचार्यांचा पुतळा आणि काही दुर्मिळ छायाचित्रं आहेत.आम्ही या संस्थेला भेट देऊन आमच्या दैवताला अभिवादन केलं…विजय कोलते यांना धन्यवाद दिले पाहिजेत..परंतू अत्रे याचं आभाळा एवढं व्यक्तिमत्व बघता हा फारच छोटा प्रयत्न आहे…सरकारनंच त्यासाठी पुढाकार घेऊन आचार्यांच्या स्मृती त्यांच्या सासवडमध्ये जागविल्या पाहिजेत..मी शेक्सपिअरचं गाव पाहिलं नाही पण असं सांगतात की,शेक्सपिअरच्या स्मृती जतन करण्यासाठी तिकडं मोठाच प्रयत्न होतो.आपल्याकडं साहित्यिक,विचारवंत,कलावंत , पत्रकारांची करता येईल तेवढी उपेक्षा केली जाते.मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला पु.ल.देशपांडे याचं नाव देण्यासही तेव्हा विरोध झाला..शेवटी नाव दिलंच गेलं नाही..नावं देताना, स्मारकं उभारताना मताचं गणित पाहिलं जात असावं..आचार्य अत्रे याचं स्मारक उभारून किती मतं मिळतील ? हा विचारही प्राधान्यानं केला जात असावा…कारण काहीही असू देत आचार्यांच्या गावात त्यांचीच होणारी उपेक्षा मनाला वेदना देऊन गेली…त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट अशी की,या संबंधितीचा उल्लेख मी माझ्या भाषणात केल्यानंतर उपस्थित स्थानिक आमदार संजय जगताप यांनी लगेच आचार्य अत्रे यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करण्याचं आणि सभागृह जेथे आहे तेथेच मोठं स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन दिलं आहे..पुरंदर तालुका पत्रकार संघानं त्यासाठी आमदार जगताप यांच्याकडं पाठपुरावा केला पाहिजे..मराठी पत्रकार परिषद देखील त्यासाठी प्रयत्न करीलच..परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या दहा वर्षाच्या प्रयत्नांनतंर बाळशास्त्री जांभेकरचं स्मारक ओरोस येथे उभं राहतंय..त्यासाठी सरकारनं साडेपाच कोटी रूपये दिले आहेत..त्याच धर्तीवर सासवडला आचार्य अत्रे याचं त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसं स्मारक झालेलं पाहायला मिळावं एवढीच अपेक्षा…
एस.एम.देशमुख
दिनांक 18 फेब्रुवारी 2020