अर्णब गोस्वामी हे दी अर्णब गोस्वामी का बनले?

0
1209

अर्णब गोस्वामी हे दी अर्णब गोस्वामी का बनले?

अर्थात, एका हिंदुत्व-राष्ट्रवादाच्या पाईक पत्रकाराचं उभरणं….

अर्णब (अर्णव नाही…काही लोक तर अरनाZZब असाही उच्चार करतात. असो) गोस्वामी यांनी टा.ना. सोडलंय. २ डिसेंबर ही त्याच्या नोटीस पिरीयडची शेवटची तारीख. त्यानंतर ते टा.ना.वर नसतील. टा.ना. सारखा राष्ट्रीय इंग्रजी न्यूज चॅनल एकहाती नं.१ ठेवणं सोपं नाही. खासकरून जेव्हा स्पर्धा प्रणॉय रॉय, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त व काही प्रमाणात करण थापर अशा ज्येष्ठतम पत्रकारांशी होती. अर्णब यांच्या राजीनाम्याच्या बातमीनंतर त्यांच्यावरच्या जोक्स-व्यंगचित्रांचं जणू पेव फुटलं. त्यात एक मुद्दा सारखा आला-येतोय की अर्णव यांच्या ओरडवाहू (कोरडवाहू सारखं ओरडवाहू) अँकरींगमुळे आणि त्यानुषंगानं येणाऱ्या स्वकेंद्रीत, विरूद्ध बाजूला गप्प करून-ठेवून कार्यक्रम करण्याच्या सवयीमुळे ते मोठे झाले. आणि हाच तर्क पुढे न्यायचा तर त्यांनी आपली वाहिनीही अशीच लाऊड न्यूजची ठेवली. पुढे लिहिण्यापूर्वी एक नोंद करावी की, टा.ना. आलं त्यावेळच्या एनडीटीव्ही व सीएनएन-आयबीएन यांच्यावर न्यूज फिचर्सच्या कंटेंटची रेलचेल होती. विविध बातम्यांचं बुलेटिन असायचं. मात्र, टा.ना.नं एक दिवस- एक विषय म्हणजे दिवसभर एकच बातमी लावून धरायची असा नवा पायंडा सुरू केला (अण्णा आंदोलनाला पहिला मोमेंटम टा.ना.ने मिळवून दिला व अन्य वाहिन्यांनी तो पुढे नेला) आणि पत्रकारितेचे आयाम बदलले. यातून टा.ना. आणि अर्णबची वेगळी ओळख तयार झाली.
टा.ना.त काम करणाऱ्या मित्रासोबत मी ८ वर्ष राहिलोय. त्यामुळे टा.ना. व अर्णब यांच्याबद्दलचा ‘आँखो देखी’ आतला लेखाजोखा कळत राहिला. यातून व बाकी पाहण्या-वाचण्यातून माझा वरील तर्क आकाराला आलाय. अर्णब अनेकदा प्रस्थापित पत्रकारांना ल्यूटन्स पत्रकार म्हणतात. दिल्लीतील ल्यूटन्स हा लब्धप्रतिष्ठित-प्रस्थापितांचा भाग. ही एक प्रवृत्तीही आहे. जी पत्रकारितेतही आहे. या प्रवृत्तीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आधुनिकता-डावा विचार हा त्यांच्यासाठी मिरवण्याचा, कुणाची तरी जिरवण्याचा आणि राबवण्याचा भाग असतो. यातूनच, मग ते परंपरा, संस्कृती, मानकं-मापदंड, संकेत, व्यक्ती-व्यक्तींचे विचार यांना धुडकावतात. असं करण्यामागे निश्चित विचार किती (कुठल्या प्रकारचा?) आणि हितसंबंध किती (कदाचित आंतरराष्ट्रीय?) हे सांगणं अवघड असतं.

लष्करी पित्याच्या घरातील अर्णब यांना अशी मूल्य आवडली नाहीत-आवडत नाहीत ते त्यांची पत्रकारिता पाहिलेल्यांना सहज समजतं. जेएनयुचा ओमर खालिद अन्य वाहिन्यांवर (इंग्लिश) एका नायकासारखा प्रॉजेक्ट होत असेल (माध्यमातील प्रतिमा-संदेशांचं राजकारण हा दीर्घ विषय आहे), तर टा.ना.वर अर्णब त्याचे वाभाडे काढतात, अपमानित करतात. राहुल गांधींच्या मुलाखतीत ते राहुल यांना मूर्ख ठरवतील पण मोदींना (प्रसंगी मुद्दामून कमी पणा घेऊन) ग्रेट ठरवतील.

अर्णब भाजप-मोदी धार्जिणे आहेत, इतकं याचं साधं सरळ विश्लेषण होऊ शकतं का? मला नाही वाटत तसं.

मगाशी, लष्करी पित्याचा उल्लेख येऊन गेलाय. आपल्याकडे राष्ट्रवाद दोन प्रकारचा ढोबळमानानं सांगता येईल. एक म्हणजे देश-देव-लष्कर-फाळणी-हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व वगैरे असा एक ढोबळ साचा. दुसरं म्हणजे देश मानतानाच (किंवा न मानताही) काही एका वैश्विक-पुरोगामी-अल्पसंख्याक हितैषी असा विचार. अर्णब बहुधा पहिल्या प्रकारात असावेत. आणि त्याला वडलांची लष्करी पार्श्वभूमी कारणीभूत असावी. पाकिस्तानबाबतीतल्या चर्चांमध्ये अर्णब ज्याप्रकारे वागतात-बोलतात त्यात हे दिसतं. आता अर्णब हिंदुत्ववादी आहेत का? तर असं बघा की नेहरू-पटेल दोघेही राष्ट्रप्रेमी-धर्मनिरपेक्षतावादी होते. मात्र, पटेल सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतात…नेहरू तसे नसतात. हा वेगळा फ्लेवर महत्वाचा. अर्णब यांच्यात मला तो फ्लेवर विथ एक्स्ट्रा देशप्रेमी ट्विस्ट आणि विथ पिंच ऑफ हिंदुत्व असा वाटतो. त्यांचा भाजप बायस हा त्यांच्या व्यक्तिवाचा बायप्रॉडक्ट आहे. उद्या जर संघर्ष काँग्रेस वि. नक्षल असेल तर अर्णब काँग्रेसच्या बाजूनं नक्षल्यांच्या विरोधात बोलतील.

असं का बरं झालं असेल? अर्णब मुळातच तसे आहेत की असा अभिनिवेश त्यांनी धारण केलाय?

या लेखाच्या सुरूवातीच्या संदर्भांना इथं लक्षात घ्यावं लागेल. बहुतांश प्रतिष्ठित पत्रकार देशप्रेम, भारतीयता (सटल हिंदुत्व), हिंदू धर्म इन स्पेसिफिक, हिंदु इन जनरल आणि त्यानुषंगानं येणाऱ्या बाबींना जवळपास हीन लेखत असतात असं मानलं जातं. किंबहुना त्याबाबींविरोधात-विरूद्ध कृती-उक्ती ते करतंच असतात. याला जोड मिळते खासकरून मुस्लिमांची (अप्रत्यक्षरित्या इस्लामची) अतिशयोक्त बाजू घेणे किंवा हिंदूंना समजून न घेणे. विविध घटनांमध्ये हा बायस बहुसंख्याकांना जाणवतो. ते असं मानतातही. हा असा मोठा वर्ग इंग्रजीत व्यक्त होत नव्हता, ना त्यांचा कुणी प्रवक्ता होता. हा वर्ग संख्या आणि संपत्ती दोन्ही बाबतीत प्रभावशाली आहे हे लक्षात घेऊयात. तरीही त्यांची परवड सुरूच राहिली. ते ज्या बाबतीत चुकीचे होते-आहेत ते तर आहेतच मात्र, लॉजिक म्हणून त्यांची जी काही बरोब बाजू असेल तीही लक्षात घेतली जात नव्हती. माझ्या पुढच्या मुद्यावर जाण्यापूर्वी मी २०१४च्या निकालानंतर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी आयबीएन-लोकमतवर चर्चेत दिलेली प्रतिक्रिया इथं मांडतो. काँग्रेसच्या या काळात हिंदू असणं म्हणजेच काही तरी चूक आहे, असं वातावरण तयार झालं होतं. हा निकाल ही त्याची प्रतिक्रिया आहे.

अर्णब गोस्वामी यांनी या चुकीच्या ठरलेल्या-ठरवल्या गेलेल्या मोठ्या वर्गाचा इंग्रजी प्रतिनिधी व्हायचं ठरवलं किंवा ते नैसर्गिकत: तसे होते व त्या पदावर आले. जुळून आलं. म्हणूनच प्रणॉय रॉय, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई- सागरिका घोष, करण थापर, प्रीतीश नंदी यांच्यापेक्षा अर्णब वेगळे ठरतात. अर्णब यांच्यात इथला एका मोठा हिंदू वर्ग आपला प्रवक्ता, आपलं समजून घेणारा पत्रकार (?) पाहतो, जसं की इथले सेक्युलर, प्रोग्रेसिव्ह लोक रॉय, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई- सागरिका घोष, करण थापर यांना आपलं मानतात. (या तुलनेचे अनेक पदर आहेत. हिंदू बहुसंख्याकांना थापर यांच्या मुलाखती आवडतात. तेव्हा वाक्य जशीच्या तशी घेऊ नयेत).

या अशा महत्वाच्या प्लस पॉईंटच्या जोडीला अर्णब यांना बातमीची असलेली समज, अजेंडा ठरवण्याची उमज, सादरीकरणातली आक्रमकता, टाईम्स समूहानं अपवाद वाटावी अशी व्यक्ती केंद्री संस्था निर्मितीची दिलेली मुभा यांची जोड लाभली. त्यातून अर्णब गोस्वामी दी अर्णब गोस्वामी बनलेत असं मला वाटतं. एक न्यूज-एक अजेंडा-एक चॅनल-एकच चेहरा हे सध्या सत्ताधारी पक्षात जाणवणारं एकेरीपण असं इथेही दिसून येतं ते त्यामुळेच.

या लेखातली नावं उलटी-पालटी केली की वेगळं चित्रंही दिसेल.

बाळ ठाकरेंच्या निधनानंतर नामदेव ढसाळांनी (बहुधा ‘मुक्त शब्द’मध्ये) लेख लिहिला होता. शीर्षक होतं…लुंपेन प्रोलितारितांचा नायक…

अर्णब तेच आहेत!

प्रसन्न जोशी यांच्या फेसबुक वॉळवरून 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here