औरंगाबाद /
केवळ मराठवाडाच नाही महाराष्ट्राच्या वृत्तपत्र सृष्टीवर आपल्या नि:स्वार्थ कर्तृत्वाची अमीट छाप उमटवणारे श्री. अण्णा उपाख्य अनंतराव भालेराव यांच्या निधनाला यंदा दोन तपे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अण्णांच्या विषयी एक मोठा ग्रंथ प्रकाशित करण्याचे योजले आहे.
हा कोणत्याही पद्धतीने आणि कोणत्याही पातळीवर व्यक्तीपूजेचा नव्हे तर एक अत्यंत व्यापक, विविधस्पर्शी आणि गंभीर प्रयत्न आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर आणि जयदेव डोळे संपादनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. जेष्ठ पत्रकार श्री. संजीव कुळकर्णी आणि जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर या कामात सहाय्य करणार आहेत. या स्मृतिग्रंथ समितीत सर्वश्री प्रा. दत्ता भगत, निशिकांत भालेराव, श्याम देशपांडे, प्रमोद माने, विनायक भाले, श्याम जैन, शाहू पाटोळे, नितीन केळकर, मंगल खिंवसरा या मान्यवरांचा समावेश आहे .
ग्रंथाच्या पहिल्या भागात स्थूलमानाने अनंतराव भालेराव यांची पत्रकारिता, त्या पत्रकारितेचा मराठवाडा आणि महाराष्ट्रावर जाणवलेला प्रभाव याविषयी महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक तसेच पत्रकारीतेच्या क्षेत्रातील मान्यवर लेखन करणार आहेत.
या ग्रंथाच्या दुसरा भाग, अनंतराव भालेराव यांचा प्रभाव मराठवाड्यातील चार पिढ्यांवर कसा पडला याविषयी असेल. या भागात, आता वयाची साठी पार केलेल्या किंवा साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या मराठवाड्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लेखन करावे असे योजले आहे.
या ग्रंथाच्या तिसर्या भागात मराठवाड्याच्या सांस्कृतिक जीवनात अनंतराव यांचे असणारे योगदान नोंदवून ठेवण्याची योजना आहे .
हा ग्रंथ ऑक्टोबर 2015च्या तिसर्या आठवड्यात प्रकाशित करण्याचे नक्की झाले आहे हे लक्षात घेता जर कोणाला त्यासाठी काही आठवणीवजा किंवा अन्य स्वरूपात लेखन करावयाची इच्छा असेल तर त्यांनी ते लेखन जुलै 2015च्या 31 तारखेपर्यंत पाठवावे. अर्थातच या आठवणी म्हणजे भक्तिभावे काढलेले उमाळे अशा स्वरूपात नसावे तर अनंत भालेराव यांचा झालेला संस्कार/प्रभाव त्यातून व्यक्त व्हावा अशी अपेक्षा आहे.
अनंत भालेराव यांच्या समग्र लेखनाचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोनातून एक संकेतस्थळ-वेबसाईटही निर्माण करण्याची योजना असून त्यादिशेने प्रयत्न सुरु झालेले आहेत.
या प्रकल्पाची प्रशासकीय व्यवस्था श्रीकांत उमरीकर पाहत असून सोयीसाठी एक अस्थायी स्वरूपाचे कार्यालय जनशक्ती वाचक चळवळ येथे सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठीचा ई-मेलanantbhalerao.granth@ gmail.com असा आहे.
लेखनासाठी व इतर चौकशीसाठी संपर्क- प्रवीण बर्दापूरकर 9822055799, जयदेव डोळे 9422316988, श्रीकांत उमरीकर 9422878575 , संजीव कुळकर्णी ९८२३१२५३४३ .